मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये विदर्भातील काही जागांवरून वाद आहेत. दोन्ही पक्षांनी विदर्भातील काही जागांवर दावा केला आहे. शनिवारी, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची 10 तास बैठक पार पाडली. मात्र, त्यातही कोणता निर्णय झाला नाही. विदर्भातील आणि मुंबईतील काही जागांवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आडमुठी भूमिका कायम असल्यााचे ठाकरे गटातील सूत्रांनी सांगितले.
advertisement
उद्धव यांनी बोलावली तातडीची बैठक....
काँग्रेसची काही जागांवरून आडमुठी भूमिका कायम असल्याने शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाना पटोले आणि काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेबाबत ठाकरे गटाने थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केली आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीसोबत यापुढे चर्चा करायची की नाही याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मातोश्रीवर
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीमध्ये काही बिघडू नये यासाठी रमेश चेन्नीथला यांना मातोश्रीवर पाठवण्यात आले अशी माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक आहे. आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत, असे चेन्नीथला यांनी ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
