मुंबई मंडळाने सध्या सुमारे 100 घरे ओळखली असून, या घरांच्या विक्रीसाठी पुढील 10 दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर थेट विक्री प्रक्रियेला सुरुवात होईल. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे या घरांसाठी कोणतीही सोडत काढली जाणार नाही. जो पहिला अर्ज करेल आणि अनामत रक्कम भरेल, त्यालाच घराचे वाटप केले जाईल. म्हाडाने या प्रक्रियेत अनेक अटी शिथिल केल्या आहेत, त्यामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
बदलतेय मुंबई! मुंबईत समुद्रीमार्गे किती आणि कुठपर्यंत कोस्टल रोड बांधले जाणार?
महागड्या घरांना मिळणार प्रतिसाद
म्हाडाच्या मुंबई मंडळातील ताडदेव आणि पवईतील घरांना आतापर्यंत कमी प्रतिसाद मिळाला होता. ताडदेवमधील ‘क्रिसेंट टॉवर’ प्रकल्पातील सुमारे सात कोटी किंमतीची सात घरे अजूनही विकली गेलेली नाहीत. तसेच, पवईतील तुंगा परिसरातील मध्यम आणि उच्च गटातील एक ते दीड कोटींची घरे देखील उपलब्ध आहेत. अॅन्टॉप हिलमधील अल्प उत्पन्न गटातील घरांचाही या योजनेत समावेश होईल.
घर खरेदीसाठी शिथिल केलेल्या अटी
म्हाडाने या योजनेतून अनेक अटी शिथिल केल्या आहेत, ज्यामुळे घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. विशेष म्हणजे उत्पन्न गटाची मर्यादा नाही. कोणत्याही उत्पन्नगटातील नागरिक अर्ज करू शकतात. प्राप्तिकर विवरणपत्र वा दाखला आवश्यक नाही. घर घेण्यासाठी करदात्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही.
घर खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेत घर घेण्यासाठी फारशा अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत. उत्पन्न गटाची मर्यादा नाही आणि प्राप्तिकर विवरणपत्र किंवा दाखला देणे बंधनकारक नाही. केवळ आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवासाचा पुरावा एवढीच कागदपत्रे आवश्यक असतील.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या नव्या ‘प्रथम प्राधान्य’ विक्री योजनेमुळे मुंबईतील रिक्त घरे लवकर विकली जातील आणि सामान्य मुंबईकरांना स्वमालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल.






