मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध उपाय केले जात आहेत. मरिन ड्राइव्ह आणि प्रियदर्शिनी पार्कदरम्यान समुद्राखालील बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील दुसरा भूमिगत मार्ग लवकरच खुला होणार आहे. या भुयारी मार्गाची लांबी जवळपास 520 मीटर असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांसह हा भुयारी मार्ग शिवडी कनेक्टरला देखील जोडण्यात येणार आहे. यामुळे कोस्टलवरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना कमी वेळात आणि सुरक्षितपणे हवे तिथे पोहोचण्यास मदत होणार आहे.
advertisement
वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पाऊल
मुंबईत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेगवेळे रस्ते, उड्डाणपुलांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील कोस्टल रोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरला आहे. याच कोस्टल रोडला आंतरमार्गिकांनी शहरातील अंतर्गत भागांना जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम वेगणाने पूर्ण करम्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत.
कसा असणार भुयारी मार्ग?
कोस्टल रोडचा हा दुसरा भुयारी मार्ग वरळी सीफेसला समांतर जे. के. कपूर चौकापासून सुरू होईल आणि बिंदू माधव ठाकरे चौकाजवळ वाहने बाहेर येतील. त्यानंतर कोस्टल रोडच्या दक्षिण आणि उत्तर मार्गिकेवर जाण्यासाठी पर्याय उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे शिवडी-वरळी कनेक्टरवरून प्रवास करणारी वाहनांना कोस्टल रोडचा वापर करून दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगरांकडे जाता येईल. येत्या काळात कोस्टल रोडवरील आणखी एक आणि शेवटची आंतरमार्गिका देखील खुली करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. ही आंतरमार्गिका बडोदा पॅलेस ते लोटस जेट्टी अशी असेल.