नेमकं घडलं काय?
मुलुंड परिसरात 25 मार्च रोजी सकाळी सुमारे 9 वाजता धक्कादायक घटना घडली. 16 वर्षीय विद्यार्थिनी मुलुंड पश्चिम येथील महाविद्यालयात आली होती. तेव्हा आशिष बनसोडे (वय 21) हा तरुण तेथे पोहोचला. दोन वर्षांपूर्वी संपलेल्या प्रेमसंबंधांमुळे तो संतप्त होता. विद्यार्थिनी त्याच्याशी बोलत नसल्याचा जाब विचारत त्याने अचानक कोयता काढून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
अचानक हल्ला झाला त्याचवेळी विद्यार्थिनीच्या मित्राने तत्परता दाखवत मध्ये पडून परिस्थिती हाताळली. त्यामुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला. मात्र आरोपीच्या वाऱ्यात मित्राच्या मानेवर जखम झाली. हल्ल्यानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर विद्यार्थिनीने मुलुंड पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तातडीने शोधमोहीम राबवली आणि चार तासांच्या आत आरोपीला अटक केली.
पालकांचा आरोप
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आरोपी काही दिवसांपासून विद्यार्थिनीला त्रास देत होता व तिला धमक्या देत होता. भीतीपोटी तिने घटनेच्या आदल्या दिवशी बदलापूर पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी केवळ ‘एनसी’ नोंदवून पुढील कारवाई केली नाही. जर वेळीच कठोर पावले उचलली असती तर ही घटना टाळता आली असती असा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांकडून करण्यात येत आहे.






