जेवण न जेवल्याने एवढी मोठा शिक्षा?
मुंबईमध्ये पुन्हा एकदा चिमुकल्यावरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील सहार गावात हा प्रकार घडलेला आहे. जिथे राहत असलेल्या एका व्यक्तीने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलावर केवळ जेवण न केल्याच्या रागातून अमानुष मारहाण केली. धक्कादायक म्हणजे ही मारहाण वडिलांनी त्याला तारा, वायर तसेच कुत्र्याच्या पट्यांनी केलेली आहे,ज्यामुळे मुलाच्या शरीरावर खोल जखमा झालेल्या असून संपूर्ण शरीर सूजलेले आहे.
advertisement
या कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. आरोपी वडील फॅब्रिकेशनचे काम करतात. काही दिवसांपूर्वी तर वाद एवढा चिघळला की आरोपीने बायकोला मारहाण करुन घराबाहेर काढले होते, पण तिने मुलाला सोबत नेले तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीदेखील दिली. त्यामुळे ती तिच्या आईकडे राहत होती आणि चिमुकला वडीलांसोबत होता.
आईला नेमकं कसं समजलं?
मात्र 25 नोव्हेंबरला आरोपी वडीलांनी अचानक बायकोला व्हिडिओ कॉल करत मुलाच्या अंगावरील जखमा दाखवल्या. मुलगा कसा जखमी झाला, हे तिने विचारताच त्याने फोन कट केला. भीतीने थरथरलेली महिला तातडीने मुलाकडे गेली. पण घराला कुलूप लागलेले पाहून तिची चिंता आणखी वाढली. शोधाशोध केल्यानंतर मुलगा शेजारच्या एका महिलेसोबत आढळून आला.
मुलाच्या अंगावर लोखंडी तार, वायर आणि पट्ट्याने मारहाणीचे स्पष्ट खुणा होत्या. मुलाने आईला सांगितले की, तो जेवायला तयार नव्हता म्हणून रागावलेल्या वडिलांनी त्याला मार दिला आणि त्यानंतर घर सोडून निघून गेले. मुलाची ही अवस्था पाहून महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.
निर्दयी बापाला अटक
क्षणाचाही विलंब न करता तिने पोलिसांकडे धाव घेत पती विरोद्धात तक्रार नोंदवली. मुलावर केलेल्या मारहाणीमुळे पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून छोट्या मुलावर इतका अमानुष अत्याचार करणाऱ्या वडिलांविरोधात संताप व्यक्त होत आहे.
