भिवंडीतील भादवड–टेमघर परिसरात उच्च विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये पतंगाच्या मांजामध्ये एक कावळा अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. प्राण्याचा जीव वाचवण्याच्या उद्देशाने अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
फायबर काठीने सुरू होते बचावकार्य
कावळ्याला सुरक्षितरीत्या सोडवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नितीन पष्टे (वय 50) यांनी फायबर काठीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. मात्र ही विद्युत वाहिनी उच्च दाबाची असल्याने क्षणात परिस्थिती बदलली.
advertisement
बचावकार्य सुरू असतानाच नितीन पष्टे यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मदतीसाठी धावून गेलेले जवान आसाराम आघाव यांनाही याच वेळी विजेचा झटका बसून गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात तणाव
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. मृत जवानाच्या संतप्त नातेवाइकांनी मुख्य अग्निशमन दलप्रमुख राजेश पवार यांच्यावर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे उच्च विद्युत वाहिनीजवळील बचावकार्यात अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्राण्यांचे प्राण वाचवताना जवानांचा जीव धोक्यात जाणे ही गंभीर बाब असून, यासाठी विशेष प्रशिक्षण, सुरक्षित उपकरणे आणि विद्युत विभागाशी समन्वयाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.






