मुंबईतील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास, घशात खवखव तसेच गुदमरल्यासारखे वाटणे या समस्या जाणवत आहेत. शहरातील अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थात AQI हा गंभीर पातळीवर पोहोचला आहे. ज्यात मडगाव, देवनार, मालाड, बोरिवली पूर्व, चकाला-अंधेरी पूर्व, नेव्ही नगर, पवई आणि मुलुंड यासारख्या भागातील वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांना जीव मोकळा नाही. परिणामी बृहन्मुंबई महानगरपालिकेने GRAP-4 नियम लागू केले आहेत.
advertisement
काय आहेत नियम?
या नियमांनुसार शहरात बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवणे बंधनकारक आहे. ज्यात 70 मीटरपेक्षा उंच बांधकाम प्रकल्पांभोवती किमान 35 फूट उंच पत्र्याचे आच्छादन असणे आवश्यक आहे तसेच एका एकरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या प्रकल्पांभोवती 35 फूट आणि एका एकरपेक्षा कमी प्रकल्पांभोवती 25 फूट उंच पत्र्याचे आच्छादन लावावे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना हिरवे कापड किंवा ताडपत्रीने झाकणे आहे. पाडकाम करताना सातत्याने पाणी शिंपडावे.
बांधकाम साहित्य चढवताना, उतरवताना आणि राडारोडा हाताळताना सतत पाण्याची फवारणी करणे आवश्यक आहे. वाहने पूर्णपणे झाकलेली असावी आणि अधिक वजन वाहू नये. बांधकाम प्रकल्पांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि वायू प्रदूषण मोजणारी संवेदक प्रणाली लावणे बंधनकारक आहे. ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग किंवा ट्रिमिंग करताना धूळ कमी करण्यासाठी पाणी फवारावे.
सर्व बांधकाम आणि पाडकाम राडारोडा नियमांनुसार निर्देशित ठिकाणी ठेवावा. वाहनांकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कर्मचारी मास्क, गॉगल आणि हेल्मेट वापरतील. मोठ्या प्रकल्पांवर 25 फूट उंच बॅरिकेडिंग असावी आणि स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलर वापरले जावे.
रात्री अवैध राडारोडा टाकणे रोखण्यासाठी विशेष पथके तैनात केले जातील. विभागाचे अधिकारी नियमितपणे कामाचे निरीक्षण करतील. वाहने आणि साहित्य नियमांनुसार नसेल तर जप्ती किंवा बंदी केली जाईल. आठ वर्षांहून जुन्या डिझेल वाहनांना शहरात प्रवेश नाही. औद्योगिक वसाहतीतील वायू प्रदूषणाचे दररोज निरीक्षण करून योग्य ती कारवाई केली जाईल.
खुली माती, वाळू, बांधकाम साहित्य सार्वजनिक जागांवर टाकणे पूर्णपणे बंद आहे. वाहने बाहेर पडताना चाके धुण्याची व्यवस्था असावी. कार्यस्थळी धूळ कमी करण्यासाठी पाणी फवारणी, झाडूने स्वच्छता आणि व्हॅक्यूम स्वीपिंग आवश्यक आहे. कामगारांसाठी जेवण तयार करण्यासाठी लाकूड इंधन न वापरता सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त व्यवस्था करणे अनिवार्य आहे.
