नेमकी घटना काय होती?
ही घटना २०२१ मध्ये अँटॉपहिल येथील म्हाडा वसाहतीत घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बालकृष्णन नाडर ऊर्फ बाला (३५) याची भाची संध्या हिने विघ्नेश नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. मात्र, विघ्नेश दुसऱ्या जातीचा असल्याने या विवाहाला मामा बालकृष्णनचा तीव्र विरोध होता. विघ्नेशची बहीण प्रियांका आणि तिचे पती वसंतकुमार यांनी या प्रेमी युगुलाला पळून जाऊन लग्न करण्यास मदत केली, असा दाट संशय बालकृष्णनला होता. याच संशयातून त्याने वसंतकुमार आणि संध्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती.
advertisement
२०२१ मध्ये एका लग्नानंतर आयोजित कार्यक्रमात वसंतकुमार आपल्या कुटुंबासह सहभागी झाला होता. यावेळी बालकृष्णन नाडर आणि त्याचा मित्र मर्गेश नाडर यांनी पूर्वनियोजित कट रचून वसंतकुमारवर कोयता आणि चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात वसंतकुमारचा जागीच मृत्यू झाला.
न्यायालयातील सुनावणी आणि साक्षीदार
वडाळा टी. टी. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली होती. विशेष ॲट्रॉसिटी न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारी वकील वीणा शेलार यांनी या प्रकरणात भक्कम पुरावे मांडले. वसंतकुमारचा मित्र, त्याची पत्नी प्रियांका यांच्यासह एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने नोंदवल्या. वडाळा टी. टी. पोलिसांनी गोळा केलेले तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
न्यायालयाचा निकाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी निकाल दिला. न्यायालयाने बालकृष्णन नाडर आणि मर्गेश नाडर या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा आणि दंड सुनावण्यात आला आहे.
