33.5 किमी लांबीच्या या भुयारी मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा म्हणजे आरे-बीकेसी सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी होता. नंतर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा कार्यान्वित झाला तरी प्रवाशांची संख्या मर्यादित राहिली. मात्र काही दिवसांपूर्वी आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने आता संपूर्ण मार्गिकेवर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एमएमआरसीने प्रवाशांच्या सोयीसाठी मासिक पास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांच्या मते, या मासिक ट्रिप पासमुळे नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना वारंवार तिकीट काढण्याच्या त्रासातून सुटका होणार असून आर्थिकदृष्ट्या देखील त्यांना फायदा होईल. सध्या पाससाठी किती फेऱ्यांचा समावेश असेल आणि त्यासाठी किती रक्कम आकारली जाईल हे पुढील दहा दिवसांत जाहीर केले जाणार आहे.
मुंबईतील इतर मार्गिकांप्रमाणेच मेट्रो 1 (घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा), मेट्रो 2अ (दहिसर-अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो 7 (दहिसर-गुंदवली) या मार्गावरही मासिक ट्रिप पास उपलब्ध आहे. त्यामुळे मेट्रो 3 मार्गिकेवरही ही सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना एकसंध आणि सोयीस्कर अनुभव मिळणार आहे.
एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मासिक पास योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा सुरू होताच प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.






