मेट्रो-3 म्हणजेच ‘आक्वा लाईन’ हा आरे–जेव्हीएलआर ते कफ परेड असा 33 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वाधिक लांबीचा भूमिगत मार्ग आहे. या मार्गिकेचा शेवटचा टप्पा केंद्र, काळबादेवी, सीएसएमटी, चर्चगेट, विधानभवन आणि कफ परेड हा नुकताच सुरू करण्यात आला. या टप्प्यामुळे मंत्रालय आणि विधानभवन परिसरातील कर्मचाऱ्यांनी चर्चगेट व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानच्या प्रवासासाठी मेट्रोचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. परिणामी प्रवासीसंख्येत झपाट्याने वाढ झाली असली तरी महत्त्वाच्या विधानभवन स्थानकावर सुविधा अपुऱ्या असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
advertisement
या स्थानकाची ‘बी-1’ ते ‘बी-3’ अशी प्रवेशद्वारे मंत्रालय विधानभवन इमारत आणि मित्तल टॉवर परिसरात उघडतात. या भागात असलेल्या 10 ते 15 व्यावसायिक टॉवरमधील कर्मचारी दररोज या प्रवेशद्वारांचा वापर करतात. मात्र स्थानक तीन मजली खोल असल्याने आणि त्यातील दोन मजल्यांसाठी सरकते जिने कार्यान्वित नसल्याने प्रवाशांना सर्व पायऱ्या चढून वर यावे लागते. त्यामुळे केवळ वेळेचा अपव्यय नाही तर वृद्ध, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय या प्रवेशद्वारांपैकी एका ठिकाणी लिफ्टची व्यवस्था असली तरी ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. लिफ्टवर ‘सेवेबाहेर’ अशी पट्टी लावलेली असल्याचे चित्र असून त्यामुळे प्रवाशांचा त्रास आणखी वाढला आहे. प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने जिने आणि लिफ्ट कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.






