बहुचर्चित समृद्धी महामार्ग हा भिवंडीजवळच्या आमने येथून सुरू होऊन नागपूरपर्यंत जातो. मुंबई आणि ठाणेकरांना आमने येथे पोहोचण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करावा लागतो. परंतु, या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीतून आता वाहनधारकांची सुटका होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) ठाण्यातून थेट आमनेपर्यंत पोहोचण्यासाठी खास प्लॅन केला आहे.
advertisement
6 हजार कोटी, 30 किमी रस्ता, देशातील हायटेक महामार्ग मुंबईला कनेक्ट होणार, वाचा कुठं आणि कधी?
काय आहे MMRDA चा प्लॅन?
एमएमआरडीए ठाण्यातील साकेत येथून आमनेपर्यंत एका नव्या मार्गाची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. 29.10 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार असून त्यासाठी तब्बल 6000 कोटी रुपयांच्या खर्चातून त्याची बांधणी केली जाणार आहे. साकेत ते आमने दरम्यानच्या या महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून मुंबई आणि ठाणेकरांना थेट समृद्धी महामार्ग गाठता येणार आहे.
कसा असेल नवा मार्ग?
साकेत ते आमने मार्ग हा 29.10 किलोमीटर अंतराचा असेल. या मार्गात तीन पूल असतील. यातील पहिला पूल हा ठाणे खाडीवर असेल. तर उर्वरित दोन मोठे पूल हे उल्हास नदीवर असतील. दरम्यान, नव्या मार्गामुळे वाहन चालकांना मुंबई - नाशिक महामार्गासोबतच वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरातील नागरिकांची देखील वाहतूक कोंडीतून सुटका होईल.