सध्या मुंबईला भातसा खोऱ्यातून प्रतिदिन सुमारे 200 कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी 140 कोटी लिटर पाण्यावर पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते मुंबई 2 आणि मुंबई 3 या मुख्य जलवाहिन्यांद्वारे शहरात आणले जाते. उर्वरित 60 कोटी लिटर पाणी वैतरणा व अप्पर वैतरणा जलवाहिन्यांमार्फत भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते.
advertisement
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! तब्बल 85 दिवसांचा पॉवर ब्लॉक, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
मुंबई–नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासह विविध विकासकामांमुळे जमिनीवरील मुख्य जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. पाणीगळती, जलवाहिन्या फुटणे तसेच चोरीसारख्या घटनांमुळे पाणीपुरवठा वारंवार खंडित होत होता. या पार्श्वभूमीवर, सुरक्षित आणि पर्यायी व्यवस्था म्हणून भूमिगत जलबोगदे उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
या प्रकल्पांतर्गत येवई जलाशय ते कशेळी असा 14 किमी आणि कशेळी ते मुलुंड असा 7 किमी जलबोगदा उभारण्यात येणार असून एकूण लांबी 21 किमी आहे. 14 किमी बोगद्याचे काम सध्या सुरू असून कशेळी परिसरातील खारफुटीमुळे 7 किमी बोगद्याचे काम रखडले होते. मात्र आता CRZ परवानगी मिळाल्याने हा अडथळा दूर झाला आहे.
जलबोगदे पूर्ण झाल्यानंतर जलाशय आणि पांजरापूर केंद्रातून येणारे पाणी मुख्यत्वे या बोगद्यांतून वाहून नेले जाईल. विद्यमान रस्त्यांवरील जलवाहिन्या आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याला अधिक सुरक्षितता आणि स्थैर्य मिळणार आहे.






