मुंबईकरांना सात तलावांतील उपलब्ध जलसाठा 354 दिवस पुरणार आहे. म्हणजेच पुढील 4 सप्टेंबर 2026 पर्यंत मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या संकटातून मुंबईकरांना यंदा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील पावसाचे अद्याप 13 दिवस बाकी असून या काळात सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या 1 हजार 648 दशलक्ष लिटर पाणीसाठी जास्त आहे.
advertisement
मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईची पाण्याची तहान देखील वाढत आहे. त्यासाठी पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. मात्र, मुंबई महापालिकेने अद्याप प्रस्तावित, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा ही धरणे मार्गी लावलेली नाहीत.
रोज 4 हजार 30 दशलक्ष पाणीपुरवठा
मुंबई पालिका मुंबई शहराला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. तर ठाणे, भिवंडी पालिका क्षेत्राला दररोज 180 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. असा एकूण 4,030 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार मुंबईला पाण्याचा मोठा साठा अपेक्षित आहे.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे सातपैकी चार तलाव भरले आहेत. 9 जुलैला मोडक सागर, 23 जुलैला तानसा तलाव, 16 ऑगस्टला तुळशी तलाव आणि 18 ऑगस्टला विहार तलाव भरून वाहू लागला होता. आता पुढील 2 आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे उर्वरित तलाव देखील तुडुंब भरण्याची शक्यता आहे.