नवी मुंबईत विविध भागांत असलेल्या कामगार नाक्यांवर दररोज सकाळी रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेली गर्दी दिसते. मात्र सध्या या नाक्यांवरील कामगारांची संख्या कमी झालेली आहे. कारण काही कामगार प्रचार कामात गुंतलेले आहेत. ज्यात प्रचार पत्रके वाटप, फलक उभारणी, रॅलीसाठी गर्दी जमवणे, घोषणा देणे, वाहनांवर झेंडे लावणे अशा अनेक कामांसाठी नाका कामगारांचा वापर केला जात आहे.
advertisement
प्रचारापासून ते बाईक रॅलीचे दर काय?
राजकीय पक्षांनी प्रचारासाठी ठराविक मानधन ठरवले आहे. पुरुष कामगारांना दिवसाला 500 ते 700 रुपये तर वाहनासह सहभागी झाल्यास अधिक रक्कम दिली जाते. महिला कामगारांनाही प्रचार रॅलींमध्ये प्राधान्य दिले जात आहे. नाष्टा, प्रवास आणि कधी कधी जेवणाची सोयही केली जाते.
यामुळे बांधकाम क्षेत्रात मात्र मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही प्रकल्पांचे काम सावकाश झाले असून कंत्राटदार अडचणीत आले आहेत. निवडणूक काळात रोजगाराची हमी मिळाल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर परिस्थिती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
