पर्यटकांसाठी खास 'निसर्ग उन्नत मार्ग'
मुंबई महापालिकेने सात महिन्यांपूर्वी मलबार हिल परिसरात ‘निसर्ग उन्नत मार्ग’अर्थात एलिव्हेटेड नेचर ट्रेलचे लोकार्पण केले होते. साधारण सात महिन्यांत हे ठिकाण मुंबईकरांच्या आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. राणीच्या बागेनंतर हे ठिकाण आता शहरातील एक नवे आकर्षण ठरत असून दिवाळीच्या सुट्यांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आतापर्यंत तब्बल दोन लाख 98 हजारांहून अधिक पर्यटकांनी या मार्गाला भेट दिली आहे.
advertisement
कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशहा मेहता उद्यान परिसरात उभारलेला हा प्रकल्प मे महिन्याच्या सुट्यांपासूनच लोकप्रिय ठरू लागला. जुलै महिन्यातही अनेकांनी येथे भेट देऊन निसर्गाचा आनंद घेतला. महापालिकेला या मार्गातून 72 लाखांहून अधिक महसूल मिळाल्याचे समोर आले आहे. सिंगापूरमधील प्रसिद्ध ‘ट्री टॉप वॉक’ संकल्पनेवर आधारित हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच उभारण्यात आला आहे.
तुम्ही कधी भेट देऊ शकता?
हे ठिकाण दररोज पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुल असतं. भारतीय नागरिकांसाठी प्रवेश शुल्क 25 रुपये असून तर परदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये आहे. मुंबईतील स्थानिकांसह देश-विदेशातून येणारे अनेक पर्यटक येथे भेट देत आहेत. हिरवाईने नटलेल्या झाडांमधून चालताना समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनोखा अनुभव पर्यटकांना मिळतो.
या ठिकाणाचे वैशिष्ट काय?
‘निसर्ग उन्नत मार्गा’वरून चालताना मुंबईची समृद्ध जैवविविधता अनुभवता येते. येथे 200 हून अधिक वनस्पती प्रजाती, विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. एका ठिकाणावरून गिरगाव चौपटीचे मनमोहक दृश्यही पाहता येते. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण खास ठरत आहे.
एकूण 2,91,836 पर्यटकांनी या मार्गाला भेट दिली असून, त्यातून सुमारे 72 लाख 98 हजार 950 रुपयांचा महसूल मिळाला आहे. निसर्ग, शांतता आणि शहरातील गोंधळापासून थोडा विरंगुळा शोधणाऱ्यांसाठी निसर्ग उन्नत मार्ग हे एक प्रमुख ठिकाण ठरत आहे
