चोरीनंतर चोरांची अफलातून युक्ती
सानपाडा येथे मागील महिन्यात एका बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील 21 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. चोरीनंतर संशय टाळण्यासाठी आरोपींनी स्वतःजवळ मोबाइल फोन न ठेवता वेगळी युक्ती आखली. स्टेशन परिसरात सीसीटीव्ही असल्याने दिसू नये म्हणून ते मध्यरात्री तीन वाजल्यापासून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत रेल्वे रुळावर बसून राहिले.
advertisement
आरिफ अन्सारी (वस34) आणि इस्तियाख अन्सारी (वय58) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते टिटवाळा परिसरातील सराईत गुन्हेगार आहेत. गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी घराची रेकी केली होती. चोरीनंतर पोलिसांचा तपास दिशाहीन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
पोलिसांच्या तपासाने केला पर्दाफाश
तपासादरम्यान स्टेशनपर्यंत आरोपी आले मात्र ते पुढे कुठे गेले याचा मागमूस लागत नव्हता. गुन्हे शाखा कक्ष 1 च्या पथकाने प्रत्येक संशयास्पद हालचालीचा मागोवा घेतला. पहाटे पहिली लोकल पकडण्यासाठी रुळावरून आलेले काही संशयास्पद लोक पोलिसांच्या नजरेत भरले. अखेर तपास टिटवाळापर्यंत पोहोचला आणि सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांच्यासह पोलिस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
