मुंबई, कोकण आणि गोवा यांदरम्यानचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि जलद व्हावा, यासाठी मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाला 2011 साली सुरुवात झाली. मात्र, तब्बल 15 वर्षे उलटूनही हा महामार्ग पूर्ण न झाल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘मुंबई–गोवा प्रवास कधी जलद होणार?’ असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
advertisement
ठाणे खाडीत इराण, अफगाणचे पाहुणे दाखल, 'फ्लेमिंगो' पाहायला कसं जायचं? तिकीट दर आणि वेळापत्रक
सध्या या महामार्गातील पनवेल–इंदापूर हा 84 किमी लांबीचा टप्पा अपूर्ण अवस्थेत आहे. एनएचएआयकडून हा टप्पा डिसेंबरमध्येच पूर्ण होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात आता मार्च 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या चौपदरीकरणाचे काम दोन भागांत विभागण्यात आले आहे. पनवेल ते कासू दरम्यानच्या 42.3 किमी लांबीच्या टप्प्याचे काम मे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडकडे असून, कासू ते इंदापूर या 42.3 किमी टप्प्याचे काम मे. कल्याण टोल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. या संपूर्ण टप्प्यासाठी सुमारे 450 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या पनवेल–कासू टप्प्याचे सुमारे 98 टक्के, तर कासू–इंदापूर टप्प्याचे अंदाजे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. कोलाड येथील उड्डाणपूल, आणखी एक उड्डाणपूल तसेच खारपाडा आणि सुकेळी येथील पथकर नाक्यांची कामे बाकी आहेत. या कामांना वेग देण्यात आला असून, ती मार्चपर्यंत पूर्ण केली जातील असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हा टप्पा सुरू झाल्यास पनवेल ते इंदापूर हा प्रवास अवघ्या सव्वा तासात पूर्ण करता येणार असून, कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.






