नाशिकमधल्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. कल्याणचे शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यासाठी ही जाहीर सभा होणार आहे. कल्याण पश्चिम हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला आहे. मोदींच्या सभेने शिवसेना-भाजप युती इथे आणखी मजबूत होईल. या सभेमुळे कल्याण पश्चिम भागालीत मतदार मोठ्या संख्येने भाजपला तर कल्याण पूर्व आणि परिसरातील मतदार शिवसेनेला मतदान करेल, असा विश्वास महायुतीला आहे.
advertisement
मोदींच्या सभेमुळे भिवंडी आणि कल्याण लोकसभेतही शहरी मतदार प्रभावित होण्याची शक्यता आहे. 2014 ला याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती, त्यावेळी भाजपचे कपिल पाटील आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांना वन साईडेड मतं मिळाली होती.
कल्याणमधल्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये रोड शो घेणार आहेत. घाटकोपर-विक्रोळी परिसरात पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे. विक्रोळीच्या अशोक सिल्क मिल्कपासून या रोड शो ला सुरूवात होईल, तर पार्श्वनाथ चौकाजवळ हा रोड शो संपणार आहे. बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी विक्रोळीमध्ये येतील. यानंतर 6.45 वाजता रोड शोला सुरूवात होईल. रात्री 8.10 मिनिटांनी पंतप्रधान विमानतळावर जातील आणि तिथून त्यांचं प्रस्थान होईल.
मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन जागांवर भाजप तर तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून मिहीर कोटेचा, उज्ज्वल निकम आणि पियुष गोयल तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे, यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर निवडणूक लढवत आहेत.
बुधवारचा महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा शुक्रवारी मुंबईत येणार आहेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिल्यांदाच एकत्र जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्रात शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्याचं मतदान सोमवार 20 मे रोजी होणार आहे, यासाठी प्रचाराच्या तोफा शनिवार 18 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता थंडावणार आहेत.