मुंबई पोलिसांच्या नावाने लुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी फोर्ट येथील एम.जी. रोडवरील अलाना सेंटर इमारतीसमोर घडली. पोडिता सुमाया मोहम्मद आब्दी (वय 26) ही केनियाची राजधानी नैरोबी येथील रहिवासी असून ती लहान मुलांच्या कपड्यांचा व्यवसाय करते. व्यवसायाच्या कामानिमित्त ती 26 जानेवारी रोजी भारतात आली होती आणि मोहम्मद अली रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबली होती.
advertisement
सोमवारी सकाळी सुमाया कपड्यांची खरेदी करण्यासाठी मोहम्मद अली रोड आणि त्यानंतर कालबादेवी परिसरात गेली होती. यावेळी तिने आपल्या चार सहकारी मैत्रिणींना आधी खरेदी केलेल्या मालाच्या मोबदल्यात 58 लाख रुपयांची रोकड दिली होती. याशिवाय तिच्याकडे स्वतःचे 3 लाख 45 हजार रुपये होते. एकूण 66.45 लाख रुपये दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवण्यात आले होते.
फोर्ट परिसरात टॅक्सी अडवली अन्...
दुपारी सुमाया आणि तिची मैत्रीण या दोघी टॅक्सीने कुलाबा येथील हॉटेलकडे जात असताना फोर्ट परिसरात एका दुचाकीस्वाराने टॅक्सी अडवली. दुचाकीवरील एकाने स्वतःला पोलिस असल्याचे सांगून तपासणीचे नाटक केले. चालक खाली उतरताच दुसऱ्या आरोपीने मागील सीटवर बसलेल्या महिलांकडे जाऊन बॅगची चौकशी केली. भीती आणि दबावामुळे महिलांनी रोकड असलेली बॅग त्यांच्याकडे दिली. पोलिस ठाण्यात नेतो असे सांगत आरोपी दुचाकीवरून फरार झाले.
घटनेनंतर घाबरलेल्या महिला थेट कुलाब्यातील हॉटेलमध्ये पोहोचल्या. तेथे गोंधळ झाल्यानंतर टॅक्सीचालकाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
