राज ठाकरेंना मराठा आरक्षणावर प्रश्न
राज ठाकरे यांना मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला गेला. मराठा आरक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. तरी देखील तोडगा निघालेला नाही. जातीपातीचं राजकारण सुरू झालं आहे. याकडे कसं बघता? असा सवाल विचारल्यावर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रश्नाच्या फैरीत अडकवलं.
एकनाथ शिंदेंना उत्तरं विचारा - राज ठाकरे
advertisement
मला असं वाटतं की, या सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदे देऊ शकतात, असं म्हणत राज ठाकरेंनी चेंडू शिंदेंच्या पारड्यात टोलवला. मी याचं उत्तरं देऊ शकत नाही. मागच्या वेळी एकनाथ शिंदे गेले होते ना... नवी मुंबईला जाऊन त्यांनी उत्तर दिली होती ना.. मग त्यांना विचारा की, मुंबईकरांना त्रास होतोय, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंची आरक्षणावर भूमिका
मराठा आरक्षणासाठी जेव्हा अंतरवाली सराटी इथं आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलिसांनी गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. त्यानंतर आंदोलन आणखी पेटलं होतं. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटी इथं जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आरक्षणावर आपली भूमिका मांडली होती. अशातच आता राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारा, असं म्हणत राजकारण पुन्हा तापवलं आहे.
उद्धव ठाकरेंकडून शिंदेंची कोंडी
दरम्यान, आरक्षणासाठी मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मुंबई मराठी लोकांची राजधानी आहे. आंदोलक दहशतवादी नाहीत, आणि जे आंदोलन करण्यासाठी आले आहेत ती आपली मराठी माणसं आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला होता.