पुढील काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांत जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीत मोहोळ विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्यामुळे मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली. सध्या मोहोळ विधानसभेचे प्रतिनिधित्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने करीत आहेत.
advertisement
विधानसभा निवडणूक लढविण्याची स्वरा भास्करच्या नवऱ्याची तयारी, महाविकास आघाडीकडे तिकीट मागितले
कोण आहेत रमेश कदम?
रमेश कदम हे २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणात त्यांना तुरुंगात जायला लागले. वर्षभरापूर्वी ते जामिनावर कारागृहातून बाहेर आले आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी तुरूंगातून विधानसभेची निवडणूक लढवली. तरीही मोहोळ तालुक्यातील जनतेने त्यांना २५ हजारांच्या आसपास मते दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपासाठी जोरबैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीमध्ये मोहोळची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता गृहीत धरून रमेश कदम यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शरद पवार यांनी कदम यांना काय सांगितले?
मोहोळ तालुक्यातील काम, गेली वर्षभर जनतेसाठी राबविलेले विविध उपक्रम, आमदार असताना केलेली कामे आदी मुद्द्यांवर कदम यांनी शरद पवार यांना माहिती दिली. जागा वाटपासंबंधी अंतिम चर्चा झाल्यानंतर आणि पक्षातील नेत्यांशी बोलून काहीच दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे कळते.
