खाकी वर्दीत आले अन् 15 तोळे सोनं पळवलं
मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईच्या नावाखाली एका महिलेच्या घरात घुसून तब्बल 20 लाख रुपयांची रोकड आणि 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप चार पोलिस कर्मचाऱ्यांवर सिद्ध झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील तक्रारदार महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे.
advertisement
चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाण्यातील दहशतवादविरोधी कक्षात कार्यरत असलेले सहायक निरीक्षक विजय सुतार, अंमलदार योगेश खांडके, नेमाणे आणि महिला शिपाई मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार महिला तुर्भे परिसरातील एका बारमध्ये काम करत असल्याची माहिती आहे.
2 जानेवारी रोजी आरसीएफ पोलिसांचे पथक चौकशीसाठी महिलेच्या घरी गेले होते. महिलेकडून बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली घेतल्यानंतर तिला बाहेर उभ्या असलेल्या पोलिस वाहनात बसवण्यात आले. याच वेळेत संबंधित पोलिसांनी घराची झडती घेत 20 लाख रुपयांची रोकड आणि 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे.
चौकशी संपल्यानंतर घरी परतल्यावर आपला मौल्यवान ऐवज गायब असल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे जाब विचारला. मात्र पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत आरोप नाकारले. तरीही महिलेनं हार न मानता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत सातत्याने पाठपुरावा केला.
तपासादरम्यान काही रक्कम आणि दागिने बारमालकाकडे सोपवण्यात आले. मात्र संपूर्ण मुद्देमाल परत न मिळाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत आरोप सत्य ठरल्यानंतर चारही पोलिसांना अटक करण्यात आली असून या प्रकरणामुळे मुंबई पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
