महानगर गॅस कंपनीच्या ॲपची बनावट लिंक पाठवून सायबर भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातील सुमारे पाच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी शमुस्तफा सैफुदिन नंबरदार (अंधेरी पूर्व- 66) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी 18 डिसेंबरला गुन्हा नोंदवला आहे. ' 'आपले महानगर' गॅसचे बिल अपडेट न केल्यास आज रात्री गॅस सेवा बंद केली जाईल', असा मेसेज 7 डिसेंबरला शमुस्तफा यांच्या मोबाइलवर आला. त्यात एका तथाकथित अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते.
advertisement
मुस्तफा यांना पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये 'महानगर गॅस बिल अपडेट' या ॲपची लिंकही होती. शमुस्तफा यांनी संपर्क साधताच फोनवरील व्यक्तीने त्यांना ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते केल्यानंतर त्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर भामट्याने शमुस्तफा यांना इतर बँक खात्यांची माहिती विचारली. शमुस्तफा यांनी भावाचे एका नॅशनल बँकेत खाते असल्याचे सांगितले. भामट्याच्या सांगण्यावरून तीच लिंक भावाच्या मोबाइलमध्ये उघडली. त्यानंतर डेबिट कार्डची माहिती घेतली गेली.
काही क्षणांतच भावाच्या खात्यातून तीन व्यवहारांत एकूण चार लाख 37 हजार 994 रुपये लंपास करण्यात आले. शमुस्तफा यांच्या खात्यातूनही 60 हजार 130 रुपये वळते झाले. काही वेळाने लिंक पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला असता 'नॉट एलिजिबल' असा संदेश आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
