एसटीच्या मोकळ्या जागेत आता ईव्ही चार्जिंग
मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेतही हरित ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. भविष्यातील वाहतूक ही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित असेल. त्यामुळे एसटी महामंडळ आतापासूनच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारत आहे.
advertisement
एसटीच्या बसगाड्या लवकरच इलेक्ट्रिक अवतारात
सध्या एसटीच्या बहुतांश बसगाड्या डिझेलवर चालतात. मात्र टप्प्याटप्प्याने या बसगाड्यांचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन सुरू आहे. भविष्यात होणाऱ्या नव्या बस खरेदीमध्येही ई-बसला प्राधान्य देण्यात येणार आहे.
याच उद्देशाने एसटीच्या जागेवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल, सीएनजीसोबतच ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. यामुळे एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार असून एकाच ठिकाणी पारंपरिक इंधन आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
हा निर्णय पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, हरित ऊर्जेच्या वापरात एसटी महामंडळ अग्रणी भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
