भायखळा महानगरपालिका शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंत एकत्र शिकलेले 64 मित्र-मैत्रिणी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. कोणी सरकारी सेवेत, कोणी व्यवसायात, तर कोणी उच्च पदांवर कार्यरत आहे. अनेकजण आज आजी-आजोबा झाले असले, तरी शाळेतील मैत्री अजूनही तितकीच जिवंत आहे.
या सर्व मित्रांना पुन्हा एकत्र आणण्याचे श्रेय विद्या गडदे (पूर्वाश्रमीच्या विद्या केदारे) यांना जाते. त्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जुन्या वर्गमित्रांचा शोध घेत 64 जणांचा ग्रुप तयार केला. याच ग्रुपच्या माध्यमातून नऊ वर्षांपूर्वी पहिले स्नेहसंमेलन झाले आणि तेव्हापासून दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कमधील नारळी बागेतच ही भेटीगाठीची परंपरा अखंड सुरू आहे.
advertisement
खेळ बघायला गेला अन् मृत्यूशी झुंज देऊ लागला; रोहितसोबत मैदानात नेमके काय घडले?
नुकतेच पार पडलेले हे या बॅचचे नववे स्नेहसंमेलन होते. या गटाचे नावही तितकेच वेगळे आणि भावनिक आहे – “आमच्यासारखे आम्हीच”. या स्नेहसंमेलनाची खास ओळख म्हणजे शाळेच्या दिवसांची आठवण जपणारी परंपरा. प्रत्येक सदस्य थोडा-थोडा खाऊ सोबत आणतो आणि अगदी शाळेत डबा एकमेकांत वाटून खायचो, त्याच पद्धतीने सर्वजण खाऊ एकमेकांना वाढतात. यामुळे जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो.
या 64 जणांच्या गटात प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असला, तरी नारळी बागेत भेटल्यानंतर सर्वजण पुन्हा दहावीच्या वर्गातले मित्र-मैत्रिणी बनतात. कोणाचं पद, ओळख किंवा काम येथे महत्त्वाचं नसून, सगळे समानपणे एका बाकावरचे मित्र म्हणूनच वावरतात. सुख-दुःखात एकमेकांना साथ देणे, अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे, हीच या गटाची खरी ताकद आहे.
व्हॉट्सॲपसारख्या डिजिटल माध्यमामुळे जपली गेलेली ही मैत्री आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, नारळी बागेत दरवर्षी जमणारी ही शाळेची मैत्री काळाच्या पुढेही तितकीच मजबूत राहणार आहे.





