अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सोमवारी बारामती येथे होती. सरकारच्या विविध योजनांचा पाढा वाचल्यानंतर त्यांनी विरोधकांचा देखील खरपूस समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, मात्र त्यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन विरोधकांचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांना जोडो मारले, आंदोलन केले. पण हिम्मत असेल तर त्यांनी आमच्यासमोर यावे, असे आव्हान अजित पवार यांनी दिले.
advertisement
अजितदादांचे आव्हान, सुषमा अंधारे यांचे बोचरे प्रत्युत्तर
राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणतात की हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन जोडा मारा. खरं तर शहाण्याला शब्दाचा मार असतो. पण ज्या धतिंगगिरीवाल्यांच्या आशीर्वादाने तलवार-बंदूक-कोयता गँगचा हैदोस सुरू आहे त्यांना शब्दांची किंवा सांकेतिक भाषा कशी कळावी? अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच जनता आता येत्या विधानसभेला मतपेटीतून जोडे मारेल, असा पलटवारही त्यांनी अजित पवार यांच्यावर केला.
अजित पवार काय म्हणाले होते?
कोणत्याही सरकारच्या काळात एखाद्या महापुरुषाचा पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहे. अशावेळी कोणत्याही विरोधकांनी दुर्दैवी घटनेचे राजकारण करता कामा नये. परंतु आमच्या विरोधकांनी आमच्या प्रतिमांना जोडे मारले. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केले.
महापुरुषांचा पुतळा कोसळावा, असे कोणत्याही सरकारला वाटणार नाही. मात्र, दुर्दैवी घटनेनंतर त्यामध्ये विरोधक राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. विविध पद्धतीने राजकारण आणत आहेत. पुतळा कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, असेच सरकारमधील शीर्षस्थ नेत्यांचे म्हणणे असल्याचे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.