गवळी थेट विमानाने मुंबईला रवाना
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नागपूर कारागृहाच्या मागच्या गेटमधून अरुण गवळीला बाहेर काढण्यात आलं. माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली. जामीन मिळाल्यानंतर गवळी थेट विमानाने मुंबईला रवाना झाला. विमानतळाबाहेर देखील मोठी सुरक्षा व्यवस्था होती. अखेर अरुण गवळी दगडी चाळीत आल्यानंतर मोठा जल्लोष झाला. पोलिसांनी फटाके वाजवण्यास मज्जाव केल्याने चाळीतल्या लोकांनी पुष्पगुच्छ देऊन गवळीचं स्वागत केलं.
advertisement
माझ्या नातवंडांसोबत वेळ घालवणार
अरुण गवळीने दगडी चाळीत आल्यावर आनंद व्यक्त केला. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अरुण गवळीने पुढं काय करायचं यावर भाष्य केलं. मी माझ्या मुलांना मोठं होताना पाहिलं नाही, त्यामुळे मी आता माझ्या नातवांसोबत वेळ घालवायचा आहे, असं अरुण गवळीने म्हटलं आहे. अरुण गवळीची मुलगी आणि बीएमसीच्या माजी नगरसेवक गीता गवळी यांनी देखील वडिलांच्या घरवापसीवर आनंद व्यक्त केला आहे.
दाऊद इब्राहिम गँगकडून हल्ल्याची शक्यता
दरम्यान, अरुण गवळीला पोलिसांच्या मोठ्या ताफ्यासह नागपूर विमानतळावर आणण्यात आलं होतं. दाऊद इब्राहिम गँगकडून हल्ल्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केल्यानंतर मोठ्या सुरक्षेत अरुण गवळीला सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आलं होतं. यावेळी ATS चे अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा देखील सोबत होता.