शॉपिग करताना 'ही' चुक नडली
ऐरोली येथे राहणारी एक महिला ऑनलाईन खरेदीसाठी एका प्रसिद्ध शॉपिंग अॅपचा वापर करत होती. त्यांनी काही वस्तू या अॅपवरून मागवल्या होत्या. खरेदीच्या प्रक्रियेदरम्यान संबंधित व्यक्तीने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी महिलेकडून मोबाईलचा अॅक्सेस मागून घेतला. विश्वास ठेऊन महिलेने मोबाईलचा अॅक्सेस दिल्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल हॅक केला.
advertisement
बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे वळवले
यानंतर आरोपीने महिलाच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 21 लाख 38 हजार 600 रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. ही संपूर्ण घटना 19 जून ते 22 जून 2025 या कालावधीत घडली असल्याचे तपासात समोर आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने तात्काळ सायबर गुन्हे शाखेला ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत बुधवारी उशिरा रात्री रबाळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून करण्यात येत असून नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना कोणालाही मोबाईल अॅक्सेस, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
