मुंबई, 31 ऑगस्ट : मुंबईत एकीकडे इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या समोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर चाकू घेऊन आत घुसण्याचा एका तरुणाने प्रयत्न केला. पण वेळीच स्कॅनरमध्ये तो आढळून आला.
आज दुपारी नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. चाकू घेऊन प्रशासकीय इमारतीत घेवून जाताना एकाला ताब्यात घेतलं आहे. बॅग स्कॅनरमध्ये बॅग स्कॅन करताना धारदार चाकू सापडला आहे. पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेतल्याने चाकू ताब्यात घेतला आहे. उमरगा येथून आलेल्या तरुणाच्या बॅगेत चाकू सापडला आहे. चाकू कशाकरता घेवून आला याबाबत पोलीस तपास करत आहेत.
advertisement
दरम्यान, मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याची घटना समोर आली आहे. या फोनद्वारे मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन देण्याची इच्छा व्यक्त केली. बोलणे करुन दिले नाही तर मंत्रालयात ठेवलेला बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली आहे. निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचा प्राथमिक तपासात उघड झालं आहे. पोलीस हेल्पलाईन 112 या नंबरवर फोन करुन त्यानेही धमकी दिली. खबरदारी म्हणून मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झालं आहे. श्वानांच्या मदतीने बॅाम्ब पोलीस शोधत आहेत.
दरम्यान, मंत्रालयाजवळ आज दुपारी आणखी एक घटना घडली. मंत्रालयाच्या जवळ सुरू असलेल्या सबवेच्या कामामुळे मंत्रालयातील गाड्यांच्या आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. या सबवेच्या कामासाठी अंतर्गत ब्लास्ट सुरू होते. ब्लास्ट करताच अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने उडाल्याने मंत्रालयातील पार्किंगला असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या तर जवळ असलेल्या खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या पाहायला मिळाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचं ही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरण L & T अधिकारी आणि कर्मचा-यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मेट्रोचे काम सुरू असताना कामा निमित्त हा स्फोट केला होता. स्फोट केल्याने दगड उडून मंत्रालय परिसरातील गाड्यांच्या काचा आणि सुधीर मुंनगंटीवार यांच्या कार्यालयाची काच फुटली होती. या प्रकरणी मंत्रालय शासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढे स्फोट करताना विशेष काळजी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे.