अहमदाबादमधील ओढव परिसरात शनिवारी दुपारी एक थरारक घटना घडली. शहरातील वॉन्टेड गुन्हेगार अभिषेक ऊर्फ संजय सिंग तोमर ऊर्फ 'शूटर-AK47' याने पोलिसांच्या हातात सापडण्याऐवजी आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी पोहोचताच तो पाचव्या मजल्याच्या इमारतीच्या गच्चीवरील रेलिंगवर जाऊन उभा राहिला आणि थेट सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग करत आत्महत्येची धमकी देऊ लागला.
advertisement
पोलिसांनी तात्काळ फायर ब्रिगेडला पाचारण केले आणि जवळपास दीड ते दोन तास हा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ सुरू होता. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याला सुखरूप खाली उतरवून ताब्यात घेण्यात आलं.
क्राइम ब्रँचला मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवम आवास परिसरातील त्याच्या घरात पोलीस पोहोचले होते. पोलिसांना पाहून त्याने दरवाजा बंद करून आत्महत्येचा हा ड्रामा सुरू केला. सुरुवातीला त्याने घराच्या खिडकीतून पळण्याचा प्रयत्न केला. नंतर शेजारच्या इमारतीच्या कठड्यावर जाऊन उभा राहून मोबाईलवरून घटना थेट सोशल मीडियावर लाईव्ह करू लागला.
क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत तो म्हणतो, “मला माहीत आहे, अटक केल्यावर तुम्ही माझ्याशी कसं वागाल. त्यापेक्षा मी मरतो.” अखेर पोलिसांनी संयम राखून आणि दक्षतेने त्याला पकडले.
7 गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी
पोलीस उपायुक्त अजीत राजियान यांनी सांगितले की, अभिषेकवर अहमदाबादच्या कृष्णनगर आणि निकोल पोलीस ठाण्यात एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. त्यातील 3 प्रकरणांत तो अजूनही फरार होता. या प्रकरणांमध्ये मारहाण, अपहरण यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. सध्या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून, पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली आहे.