वादाचं कारण: ४ महिन्यांचं बाळ आणि स्ट्रोलर
अंकित दीवान नावाचे प्रवासी आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. त्यांच्यासोबत ४ महिन्यांचे बाळ आणि त्याचे स्ट्रोलर (बॅबी गाडी) असल्याने, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या (Staff Line) रांगेतून जाण्यास सांगितले. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या कॅप्टन वीरेंद्र याने रांग तोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अंकित यांनी याला विरोध केला, तेव्हा वैमानिकाचा पारा चढला. "तुम्ही अशिक्षित आहात का? हा स्टाफचा रस्ता आहे हे वाचता येत नाही का?" असे म्हणत वैमानिकाने अंकित यांना अपमानित करण्यास सुरुवात केली.
advertisement
७ वर्षांच्या लेकीसमोर बापाला बेदम मारहाण
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वैमानिकाने अंकित यांच्यावर शारीरिक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, अंकित यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन रक्त वाहू लागले. स्वतः वैमानिकाच्या शर्टवरही या प्रवाशाच्या रक्ताचे डाग पडले होते. अंकित यांनी सोशल मीडियावर आपली व्यथा मांडताना सांगितले की, "माझ्या ७ वर्षांच्या मुलीने तिच्या वडिलांना इतक्या निर्दयीपणे मार खाताना पाहिले. ती प्रचंड दहशतीत आहे आणि आमची सुट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे."
एअर इंडिया एक्सप्रेसची तडकाफडकी कारवाई
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसने तातडीने दखल घेतली आहे. कंपनीने या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त केला असून संबंधित वैमानिकाला तात्काळ प्रभावाने ड्युटीवरून हटवले आहे. एअरलाइनने स्पष्ट केले की, संबंधित कर्मचारी त्यावेळी दुसऱ्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवासी म्हणून प्रवास करत होता. मात्र, त्याचे वर्तन हे कंपनीच्या धोरणांच्या विरोधात असल्याने त्याच्यावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाणार आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीकडून तपासाचे आदेश
"आम्ही अशा प्रकारच्या हिंसक वर्तनाचा निषेध करतो. विमानतळावर झालेल्या या वादाची सखोल चौकशी केली जात असून, चौकशीच्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलली जातील," असे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
