इंदूर (प्रतिनिधी – मिथिलेश गुप्ता): भारतात सध्या महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Women’s World Cup 2025) सुरू आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह अनेक देशांच्या महिला क्रिकेट संघांनी यावेळी भारतात खेळत आहेत. या स्पर्धेदरम्यान एक अत्यंत लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना घडली. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंशी छेडछाड झाल्याची घटना घडली असून त्यामुळे क्रीडा जगतात तसेच स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
घटनेनंतर इंदूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हा प्रकार 23 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता रिंग रोडवरील सम्यक स्टोनजवळील सर्व्हिस रोडवर घडला. दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू हॉटेलमधून बाहेर पडून एका कॅफेकडे चालल्या होत्या. त्याचवेळी एक बाइकस्वार व्यक्तीने त्यांचा पाठलाग करून एका खेळाडूला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तात्काळ पळ काढला. ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपी अकील याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेने शहरात संताप पसरला असतानाच मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पीडित महिला क्रिकेटपटूंवरच दोष टाकल्यासारखे बोलून वादग्रस्त विधान केले. विजयवर्गीय म्हणाले, कोणताही खेळाडू जेव्हा बाहेर जातो, तेव्हा त्याने किमान स्थानिक अधिकाऱ्यांना किंवा सुरक्षा व्यवस्थेला माहिती द्यायला हवी. त्यामुळे पुढे अशा घटना टाळता येऊ शकतात. क्रिकेट खेळाडूंचा देशभरात मोठा क्रेझ आहे. आपण जेव्हा बाहेर जातो, तेव्हा काही वेळा चाहत्यांची गर्दी अशी होते की त्यांच्या वागण्यावर आपलं नियंत्रण राहत नाही.
त्यांनी पुढे उदाहरण देत सांगितले, मी स्वतः इंग्लंडमध्ये फुटबॉल खेळाडूंचे कपडे फाटताना पाहिले आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तिथे काही फुटबॉलपटू कॉफी घेत होते. काही तरुण त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागायला आले. एका मुलीने तर चाहत्यांच्या गर्दीत त्यांना चूमले आणि त्यांचे कपडे फाटले. तो खेळाडू फार प्रसिद्ध होता. त्यामुळे खेळाडूंनी त्यांच्या लोकप्रियतेबद्दल जागरूक असायला हवं.
विजयवर्गीय म्हणाले, खेळाडूंना स्वतःच्या लोकप्रियतेचा अंदाज नसतो. ते खूप प्रसिद्ध असतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. इंदूरमध्ये जे घडलं, ते सर्वांसाठी धडा आहे. खेळाडूंसाठीही आणि आपल्यासाठीही.
या वक्तव्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे की, पीडित महिलांवर दोष टाकणं हा दुसरा अपराध आहे. तर काहींनी असा दावा केला आहे की अशा वक्तव्यांमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत चुकीचा संदेश समाजात जातो.
या घटनेनंतर इंदूर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून, परदेशी खेळाडूंच्या हॉटेल्स आणि प्रवास मार्गांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. आरोपी अकीलविरुद्ध छेडछाड आणि महिलांच्या सन्मानभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने भारतातील महिला क्रिकेट स्पर्धेच्या वातावरणावर काळी सावली टाकली असून, क्रीडा संघटनांनी महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
