ईडीने ऐश्वर्या यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटक केली आहे. तिच्यावर गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी दोन आठवड्यांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
ऐश्वर्याने स्वतःला काँग्रेस नेते डी.के. सुरेश व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची बहीण असल्याचे सांगून श्रीमंत डॉक्टर व व्यापाऱ्यांमध्ये आपली घुसखोरी केली. गेल्या वर्षभरात बंगळुरू पोलिसांनी तिच्यावर फसवणुकीचे चार गुन्हे नोंदवले आहेत.
advertisement
ज्वेलरी दुकानाच्या मालकीन बाईंची फसवणूक
तिने पोलिसांमार्फत वनिता ऐथल यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) मिळवले. वनिता या एका ज्वेलरी स्टोअरच्या मालक आहेत. त्यांनी ऐश्वर्यावर ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. वनिता म्हणाल्या की, ऐश्वर्याने त्यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवले होते, परंतु नंतर विश्वासघात केला. ज्वेलरी व्यावसायिकांबरोबरच, ऐश्वर्याने दोन डॉक्टर, एक प्रसुतीतज्ज्ञ आणि एका व्यापाऱ्याच्या कुटुंबाला देखील गंडवले. हे डॉक्टर प्लास्टिक सर्जरी सेंटर चालवतात.
लक्झरी हॉटेलमधील व्हीआयपी रूम
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याने स्वतःला एक श्रीमंत रिअल इस्टेट डीलर म्हणून भासवले होते. त्यामुळे ती डॉक्टर, व्यापारी आणि नेत्यांपर्यंत पोहोचली. उत्तर बंगळुरूमधील एका लक्झरी हॉटेलमध्ये तिने व्हीआयपी रूम घेतली, स्वतःच्या श्रीमंतीचा दिखावा करण्याचा ती वारंवार प्रयत्न करीत होती. पोलिसांनी सांगितले की, तिच्याकडे बॉडीगार्ड्स आणि महागड्या कारचा ताफाही होता.
आमदार विनय कुलकर्णी यांच्यावर ईडीचा छापा
काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्याशी ऐश्वर्याचे संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांचे एकत्रित फोटोही समोर आले आहेत. ऐश्वर्याने त्यांना एक महागडी कार दिल्याचाही आरोप आहे. मात्र कुलकर्णी यांनी हे आरोप फेटाळले असून ते म्हणाले की, ऐश्वर्यापासून त्यांना कोणतेही गिफ्ट मिळालेले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये केवळ ओळख आहे. गुरुवारी ईडीने त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी केली.
विनय कुलकर्णी यांचे स्पष्टीकरण
यावर प्रतिक्रिया देताना विनय कुलकर्णी म्हणाले की, ईडी एका प्रकरणात चौकशी करत आहे. गेल्या महिनाभरापासून मला त्रास दिला जात आहे. कोणालाही त्रास देण्याची एक सीमा असते. मला हे पाहून वाईट वाटते काही लोक सत्तेचा गैरवापर करत आहेत. ते मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जनतेपासून तोडण्याचा डाव आखत आहेत, असे आरोप त्यांनी केले.