पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या आधी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठे राजकीय पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. या वेळेस पक्ष केवळ स्थानिक नेत्यांवर अवलंबून राहणार नसून, आपल्या तीन दिग्गज खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची योजना आखत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ एकाच वेळी राजपूत, यादव आणि मागास समाजातील (निषाद वर्ग) मतदारांना साधण्यासाठी आखला गेला आहे. पक्षातील सूत्रांच्या मते, भाजप बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या तीन प्रभावशाली खासदारांना उमेदवार म्हणून उतरवू शकते.
advertisement
यादव मतदारांवर भाजपचा फोकस
बिहारच्या राजकारणात यादव मतदारांचे प्रचंड महत्त्व आहे. त्यांच्या लोकसंख्येचा वाटा सुमारे 14.3 टक्के असून, हा मोठा मतदारवर्ग गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबत घट्टपणे जोडलेला आहे. त्यामुळेच यादव समाज आणि उत्तर बिहार तसेच मिथिलांचलमधील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप एका प्रभावशाली यादव खासदाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार करत आहे. यादव समाजातून येणाऱ्या या खासदाराचे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते.
राजपूत समाजाला दिला जाणार मोठा संदेश
बिहारमधील सुमारे 3.45 टक्के मतदार राजपूत समाजाचे आहेत आणि या समाजाचा बिहारमध्ये मोठा जनाधार आहे. त्यामुळे राजपूत मतदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप एका मोठ्या राजपूत खासदाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. पाटणा, छपरा आणि सारणसह बिहारच्या विविध भागांतील राजपूत मतदारांना स्पष्ट संदेश देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलले आहे. या खासदाराचा आपल्या क्षेत्रात मोठा प्रभाव असून, त्यांची निवड पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते, असे राजकीय विश्लेषक मानतात.
निषाद समाजासाठी भाजपची वेगळी रणनीती
बिहारच्या राजकारणात निषाद समुदाय (मल्लाह, बिंद आणि इतर मच्छीमार जाती) ही एक राजकीय ताकद बनत आहे. 2023 च्या बिहार जाती गणनेनुसार, निषाद समाजाची लोकसंख्या सुमारे 5.5 टक्के आहे, ज्यामुळे तो अति मागासवर्गातील (EBC) एक प्रभावशाली उपवर्ग मानला जातो. जातीवार आकडेवारीनुसार मल्लाह समाजाचा वाटा सुमारे 2.6 टक्के आहे. परंतु निषाद, मल्लाह, केवट, बिंद, कश्यप आणि जलाधारित व्यवसायांशी संबंधित इतर उपजाती मिळून त्यांची एकूण लोकसंख्या 8 ते 9 टक्क्यांपर्यंत पोहोचते.
मुजफ्फरपूर, वैशाली, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, भागलपूर आणि खगडिया या जिल्ह्यांमध्ये नद्यांच्या काठावर वसलेल्या निषाद वस्त्या अनेकदा स्थानिक राजकीय समीकरण ठरवतात. त्यामुळे या समाजाच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणखी एका प्रभावशाली खासदाराला विधानसभा निवडणुकीत उतरवू शकते.
जातीय समीकरणांवर भाजपचा भर
बिहारची राजकीय परिस्थिती नेहमीच जातीय समीकरणांभोवती फिरत आली आहे. भाजपला हे नीट ठाऊक आहे की या वेळीचा निवडणुकीचा सामना हा नीतीशकुमार यांच्या अनुभव आणि तेजस्वी यादव यांच्या जोशाच्या लढतीसोबतच जातीय आधारावरही ठरणार आहे.
अशा स्थितीत जर भाजपने हे तीन दिग्गज खासदार निवडणुकीत उतरवले, तर पक्ष एकाच वेळी विविध समाजगट आणि प्रदेशांमध्ये आपली पकड मजबूत करू शकेल. राजकीय विश्लेषकांच्या मते- भाजपचा हा डाव म्हणजे एक तीर से तीन निशाने असा ठरेल. यामुळे यादव समाजात पक्षाची पकड वाढेल, राजपूत समाजाला स्पष्ट संदेश जाईल की भाजप त्यांना दुर्लक्षित करत नाही आणि त्याचवेळी मागास वर्गातही पक्ष आपली मुळे अधिक खोलवर रुजवू शकेल.