पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांची नव्याने स्थापन झालेली जनशक्ती जनता दल (JJD) पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. तेज प्रताप स्वतः महुआ मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून प्रचारास सुरूवात केली आहे. त्यांनी मतदारसंघाला विकासाचे केंद्र बनवण्याचा संकल्प मांडला आहे.
advertisement
तेज प्रताप यांनी महुआ येथील आपल्या प्रचार सभेदरम्यान सांगितले की, महुआ मतदारसंघातून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोक आमच्यावर विश्वास दाखवत आहेत. आम्ही महुआमध्ये मेडिकल कॉलेज दिलं आहे आणि आता निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. इतकंच नाही, आम्ही महुआमध्ये क्रिकेट स्टेडियम देखील बांधू. त्या मैदानावर आम्ही भारत आणि पाकिस्तानचा सामनाही आयोजित करू. महुआमध्ये आमच्या विरोधात कोणी टक्कर देऊ शकेल, अशी स्थितीच नाही.
पत्रकारांनी ‘जननायक’ या शब्दावर विचारले असता तेज प्रताप यांनी स्पष्ट केले, जननायक कोण आहे हे आम्ही सध्या सांगू शकत नाही. आमचे जननायक डॉ. राममनोहर लोहिया, कर्पूरी ठाकूर आणि लालू प्रसाद यादव आहेत. तेजस्वी यादव अजून जननायक नाहीत, कारण ते आपल्या स्वतःच्या बळावर उभे नाहीत. ते आजही आमच्या वडिलांच्या बळावर आहेत. पण ज्यादिवशी ते स्वतःच्या बळावर पुढे येतील, त्या दिवशी सर्वात पहिला मीच त्यांना जननायक म्हणेन.
लालू प्रसाद यांच्या पक्षात ‘लालटेन युग’ संपत चालल्याच्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. लालटेन युग संपवायचं असेल, तर ते लालटेनधारीच संपवतील. आता मी आरजेडीमध्ये नाही. मला कोणत्याही पदाचा लोभ नाही. आरजेडीमध्ये जर मला कोणतेही पद देऊ केले, तर मी सर्वात आधी त्याचा त्याग करीन. मी कधीही कोणत्याही पक्षासोबत गठबंधन करणार नाही.
दरम्यान बिहारमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर रोजी पार पडेल. दोन्ही टप्प्यांनंतर मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होईल. या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यादव यांच्या नव्या पक्षाची भूमिका आणि त्यांचा प्रभाव आगामी निवडणुकीत किती ठरेल, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.
