एकीकडे भारत- पाकिस्तानमधील संघर्षाची धग वाढत असताना आता चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यावेळी दोन्ही देशात संघर्षाची ठिणगी पडली, तेव्हा चीन पाकिस्तानची बाजू घेईल असं म्हटलं जात होतं. मात्र चीनने ऐनवेळी कोलांटउडी मारत तटस्थ भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. ही भारतासाठी गूड न्यूज समजली जात आहे. कारण चीन पाकिस्तानच्या मदतीला उतरला असता तर भारतासमोरील आव्हान आणखी वाढलं असतं. पण तसं झालं नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन काढत दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं आहे.
advertisement
भारत आणि पाकिस्तानला तणाव वाढू नये, यावर चीनने भर दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही भारत आणि पाकिस्तान दोघांनाही शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य देण्याचे, शांत आणि संयमी राहण्याचे, शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आणि दोन्ही देशात तणाव वाढेल, अशी कृती टाळण्याचे आवाहन करतो."
दुसरीकडे, पाकिस्तानने शुक्रवारी १० मे २०२५ रोजी जम्मूमधील प्रसिद्ध प्रार्थनास्थळ शंभू मंदिर आणि नागरी परिसराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकने रात्री अनेक सशस्त्र ड्रोन पाठवले. ज्यामुळे नागरिक आणि धार्मिक स्थळांना धोका निर्माण झाला. भारतीय सशस्त्र दलाच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानचा हा इरादा हाणून पाडण्यात आला.