दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संध्याकाळी ६.५५ वाजेच्या सुमारास एका हुंदईच्या I20 कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, शेजारी उभ्या असलेल्या कार, रिक्षा आणि दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार लाल किल्ल्याच्या परिसरात पोहोचली असता स्फोट झाला. या स्फोटामुळे कारमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार नदीम खान नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार हरियाणा भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
धक्कादायक म्हणजे, हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचं आता समोर आलं आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. स्फोटामध्ये IED चा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. IED स्फोट हा दहशतवादी किंवा माओवाद्यांकडून घडवण्यात आल्याच्या आतापर्यंतच्या घटना आहे. या स्फोटानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. गृहमंत्रालयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, तपास यंत्रणांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. नरेंद्र मोदी यांनी स्फोटात मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
