टीएमसी नेते आणि बोंगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आध्या यांच्या निवासस्थानी ईडीकडून शुक्रवारपासून छापेमारी सुरू आहे. ईडीने रात्री उशिरा शंकर आध्या यांना अटक केली. शंकर आध्या यांच्या घरी आणि सासरीसुद्धा छापे टाकले. त्यांच्या घरी साडे आठ लाख रुपयांची रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचं सांगितलं जात आहे.
कारवाई करण्यासाठी आलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना याआधी पश्चिम बंगालमध्ये घडली होती. त्यानंतर अटकेच्यावेळीही हल्ला झाला. शंकर यांना अटक करण्यासाठी ईडीचे पथक पोहोचले तेव्हा टीएमसी समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. सीआरपीएफ जवानांच्या मदतीने ईडीने अटकेची कारवाई केली. शंकर आध्या यांना कोलकात्यात आणण्यात आलं आहे.
याआधी शाहजहाँ शेक यांच्या निवासस्थानी कारवाईसाठी गेल्यानंतर ईडीच्या पथकावर हल्ला झाला होता. पश्चिम बंगालच्या २४ परगना जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात काही अधिकाऱ्यांना दुखापत झाली. याशिवाय त्यांचे फोन आणि पैसेही चोरे झाले. याप्रकरणी ईडीने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.