नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या एका आठवड्यापासून बातम्यांमध्ये असे म्हटले जात आहे की- कफ सिरप प्यायल्याने मुलांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
आता आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी एक मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनेमध्ये पालकांना विशेषतः हे लक्षात ठेवण्यास सांगितले आहे की, जर बाळ 2 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याला खोकला आणि सर्दीचे कोणतेही औषध अजिबात देऊ नये. अशा प्रकरणांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
काय आहे प्रकरण?
ANI वृत्तसंस्थेनुसार मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याचे सहाय्यक प्राध्यापक आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. पवन नंदुरकर यांच्या माहितीनुसार किमान 9 मुलांचा मृत्यू बनावट कफ सिरपच्या सेवनाने झाला आहे. कुटुंबांचे म्हणणे आहे की- मुलांना आधी सर्दी, खोकला आणि ताप आला. त्यानंतर त्यांची किडनी निकामी झाली आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. हे मृत्यू आणि किडनी निकामी होण्याची प्रकरणे कफ सिरपशी जोडलेली असू शकतात, परंतु तपास सुरू आहे आणि किडनीच्या दुखापतीचे कारण काहीतरी दुसरेही असू शकते, असे डॉ. नंदुरकर यांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयाने काय म्हटले?
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की- या दाव्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि अनेक चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) आणि राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीमने घटनास्थळांना भेट दिली आणि खोकल्याच्या अनेक औषधांचे नमुने गोळा केले.
प्राथमिक तपासणीत कोणत्याही नमुन्यात डायथिलिन ग्लायकॉल (DEG) किंवा इथिलिन ग्लायकॉल (EG) आढळले नाही, जे किडनीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरू शकतात. मध्य प्रदेश SFDA ने देखील तीन नमुन्यांची तपासणी केली आणि DEG/EG ची अनुपस्थिती निश्चित केली. सरकारने हे देखील स्पष्ट केले की- राजस्थानमधील दोन मुलांच्या मृत्यूशी संबंधित उत्पादनामध्ये प्रोपीलीन ग्लायकॉल (Propylene Glycol) आढळले नाही आणि हे औषध डेक्सट्रोमेथॉर्फन (dextromethorphan) आधारित आहे, जे लहान मुलांसाठी वापरण्याची शिफारस केलेली नाही.
मृत्यूच्या कारणाची चौकशी सुरू
डॉक्टरांनी सांगितले आहे की- लहान मुलांमध्ये किडनीची समस्या आणि मृत्यू 'Coldrif' कफ सिरपच्या सेवनाशी संबंधित असू शकतात.परंतु ANI च्या अहवालानुसार या समस्येचे कारण काहीतरी दुसरेही असू शकते, जे तपासाअंती स्पष्ट होईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की- पाणी, जीवाणू आणि श्वासोच्छ्वासाशी संबंधित नमुन्यांची तपासणी NEERI, NIV पुणे आणि इतर प्रयोगशाळांद्वारे केली जात आहे.
NCDC, NIV, ICMR, AIIMS नागपूर आणि राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची तज्ज्ञ टीम सर्व संभाव्य कारणांची तपासणी करत आहे. मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांना बालरोगविषयक खोकल्याच्या औषधांचा विवेकपूर्ण वापर करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
राजस्थान सरकारने चौकशी समिती नेमली
राजस्थान सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे, जी लवकरच आपला अहवाल देईल. राजस्थानचे औषध नियंत्रक अजय पाठक यांनी सांगितले की- सिकर आणि भरतपूरमध्ये Dexamethasone सिरपच्या सेवनानंतर मुलांना त्रास झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी स्पष्ट केले की, हे सिरप 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिले जाऊ नये. तसेच हे मृत्यू दूषित खोकल्याच्या औषधाशी संबंधित नाहीत.
या खोकल्याच्या औषधांवर बंदी
मध्य प्रदेश सरकारने या घटनेनंतर 'Coldrif' आणि 'Nextro-DS' या दोन खोकल्याच्या औषधांवर प्रतिबंध लावला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र शुक्ला म्हणाले की- प्राथमिक तपासणीत कोणत्याही प्रकारच्या दूषिततेचे संकेत मिळाले नाहीत आणि हे मृत्यू निश्चितपणे खोकल्याच्या औषधामुळे झालेले नाहीत. आता ICMR च्या अहवालाची प्रतीक्षा आहे. News 18 च्या माहितीनुसार तामिळनाडू सरकारने देखील 3 ऑक्टोबर रोजी Coldrif खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर प्रतिबंध लावला असून, राज्य औषध प्राधिकरण या प्रकरणाचा तपास करत आहे.