ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्रामवर 1.33 लाख फॉलोअर्स, फेसबुकवर 3.21 लाख फॉलोअर्स आणि यूट्यूबवर जवळपास 4 लाख सबस्क्रायबर्स आहेत. ती मनाली, मसूरी, जैसलमेर, जयपूर आणि काश्मीर यांसारख्या भारतातील विविध पर्यटन स्थळांवर व्हिडिओ बनवून प्रसिद्ध झाली होती. तिचे प्रवास व्हिडिओ अनेकजण आवडीने बघत होते.
तपास यंत्रणांनी असा दावा केला आहे की ज्योतीचे पाकिस्तानला जाणे आणि तेथे काही विशिष्ट लोकांशी भेटणे संशयाच्या भोवऱ्यात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये ती पाकिस्तानच्या उच्चायुक्तांच्या एका पार्टीत इतर भारतीय व्लॉगर्ससोबत दिसली होती. याच भेटीनंतर तिच्या कथित हेरगिरीची कहाणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
advertisement
माझी मुलगी दिल्लीत...
ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझी मुलगी दिल्लीत राहून महिन्याला 20-25 हजार रुपये कमवत होती. कोविडनंतर ती हिसारला परत आली होती. ज्योतीने केवळ प्रवासाच्या आवडीतून यूट्यूब चॅनेल सुरू केले होते, परंतु आता तिच्यावर जे आरोप लागले आहेत, ते अत्यंत धक्कादायक आहेत. त्यांना या आरोपांवर विश्वास बसत नाहीये.
कशी बनली पाकिस्तानची हेर?
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या धोरणांचे समर्थन करण्यासाठी विदेशी एजंट्सनी ज्योतीची निवड केली होती. असे सांगितले जात आहे की पाकिस्तानात तिचा व्यवहार संशयास्पद होता आणि ती अशा काही लोकांच्या संपर्कात होती, ज्यांना देशाच्या सुरक्षिततेसाठी धोका मानले जाते.
आता ज्योतीवर देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आणि संवेदनशील माहिती (sensitive information) शेअर केल्याचा संशय आहे. तपास यंत्रणा हे शोधण्यात गुंतल्या आहेत की तिचा कोणाशी संपर्क होता, तिने कोणती माहिती दिली आणि त्याबदल्यात तिला काही आर्थिक लाभ मिळाला होता का. या प्रकरणाच्या अधिक तपासातून सत्य काय आहे. हे लवकरच समोर येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.