एस. सोमनाथ हे लुधियानातील सतपाल मित्तल शाळेतील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सोमनाथ यांनी चांद्रयान-4 बद्दल माहिती दिली. इस्रो आपल्या चंद्र मोहिमेसाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. सोमनाथ यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2040 च्या दशकाच्या सुरुवातीला चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला उतरवण्याचं ध्येय ठेवलं आहे.
चंद्रयान-3 मिशनच्या टीमला पुरस्कार
advertisement
भारताच्या चांद्रयान-3 मिशन टीमला अंतराळ संशोधनासाठी 2024 या वर्षातील प्रतिष्ठित जॉन एल. जॅक स्विगर्ट ज्युनिअर पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी (8 एप्रिल) अमेरिकेतील कॉलोरॅडो येथील वार्षिक स्पेस सिम्पोझियमच्या उदघाटन समारंभात या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. ह्युस्टनमधील भारताचे महावाणिज्यदूत डी. सी. मंजुनाथ यांनी इस्रोच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले राष्ट्र म्हणून, इस्रोने विकसित केलेलं चांद्रयान-3 मिशन मानवजातीच्या अंतराळ संशोधन आकांक्षांना समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. अंतराळ क्षेत्रातील सहकार्यासाठी नवीन पाया या मिशनने रचला आहे, असं स्पेस फाउंडेशनने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
जानेवारीमध्ये भारताला पुरस्कार जाहीर करताना स्पेस फाउंडेशनच्या सीईओ हीथर प्रिंगल एका निवेदनात म्हणाल्या होत्या की, अंतराळातील भारताचे नेतृत्व जगासाठी प्रेरणादायी आहे. चांद्रयान-3 टीमने अवकाश संशोधनाचा स्तर पुन्हा उंचावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी सॉफ्ट लँडिंग आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र असून भविष्यात ती काय करेल हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.