बेंगळुरू: कर्नाटकमध्ये पंचायत विभागातील एका अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण अशा वेळी घडले आहे, जेव्हा राज्यातील काँग्रेस सरकारने नुकतेच सार्वजनिक ठिकाणी संघाच्या उपक्रमांवर निर्बंध घालणारे नियम लागू केले आहेत. या कारवाईचा निषेध करताना राज्यातील भाजपने काँग्रेसवर विकृत आणि हिंदूविरोधी मानसिकतेचा आरोप केला आहे.
advertisement
सिरवार तालुक्यातील पंचायत विकास अधिकारी प्रवीण कुमार के.पी. यांना ग्रामीण विकास आणि पंचायत राज (RDPR) विभागाने शुक्रवारी निलंबित केले. कारण त्यांनी 12 ऑक्टोबर रोजी लिंगसुगूर येथे झालेल्या RSS च्या शताब्दी कार्यक्रमात गणवेश परिधान करून आणि हातात काठी घेत सहभागी झाले होते.
ही कारवाई आयएएस अधिकारी अरुंधती चंद्रशेखर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे. आदेशात म्हटलं आहे की- प्रवीण कुमार यांनी नागरी सेवा आचारसंहितेतील शिस्त व राजकीय तटस्थतेचे नियम मोडले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे अधिकारी म्हणून अपेक्षित आचारधर्माचं उल्लंघन झालं आहे. त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत ते निलंबित राहतील आणि त्यांना केवळ निर्वाह भत्ता दिला जाईल.
अधिकाऱ्यांनी कर्नाटक सिव्हिल सर्व्हिसेस (कंडक्ट) रूल्स, 2021 मधील नियम 3 चे उल्लंघन केले आहे. या नियमांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय तटस्थता, प्रामाणिकपणा आणि त्यांच्या पदाला साजेशी वर्तणूक राखणे आवश्यक आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना भाजपचे राज्याध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी म्हटलं की- ही कारवाई देशभक्तीच्या भावना दडपण्याचा प्रकार असून काँग्रेस सरकारचं हिंदूविरोधी आणि विकृत मानसिकतेचं दर्शन घडवत आहे. काँग्रेस सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे. ही निलंबनाची कारवाई त्वरित मागे घेऊन अधिकाऱ्यांची माफी मागावी, अन्यथा लोकशाही मार्गाने याला योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल.
दरम्यान काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. राज्य सरकारने नुकतंच एक आदेश जारी करून सांगितलं आहे की- कोणत्याही संस्थेला सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी आधी परवानगी घेणं आवश्यक असेल. या आदेशानंतर मंत्री प्रियंक खर्गे यांनी सार्वजनिक ठिकाणी RSS च्या उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर RSS ने थेट मंत्री खर्गे यांनाच आव्हान दिलं आहे. त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी खर्गे यांच्या चित्तापूर मतदारसंघात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चासाठी परवानगीचा अर्ज पोलिसांकडे दिला असला तरी अजूनही निर्णय झालेला नाही. दरम्यान स्थानिक प्रशासनाने या मोर्चाच्या तयारीवर कारवाई सुरू केली आहे. शहरात लावण्यात आलेले भगवे झेंडे आणि बॅनर्स उतरवले जात आहेत.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना प्रियंक खर्गे म्हणाले- भाजप नेत्यांच्या मुलांनी माझ्या मतदारसंघात RSS चा गणवेश घालून येऊ द्या, मी त्यांचं स्वागतच करीन. त्यांना चालत मोर्चा काढायचा असेल तर हरकत नाही, पण नियम पाळावे लागतील. नियमांचं उल्लंघन झालं, तर कायदेशीर कारवाई होईल, असं त्यांनी बेंगळुरूमध्ये स्पष्ट केलं.