30 वर्षांची झुंज - निसार अहमद मीर यांची प्रेरणादायी कथा
या ऐतिहासिक प्रकल्पामध्ये विशेष योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे निसार अहमद मीर. गेली 30 वर्षे त्यांनी या प्रकल्पासाठी झगडत राहिले. 1996 मध्ये रेल्वेची परीक्षा पास केल्यानंतर निसार मीर यांची या कश्मीर रेल्वे प्रकल्पावर नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत राहिले. त्यांचं मुख्य काम रेल्वेसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचं होतं. मात्र हे काम करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
advertisement
विरोध, मारहाण आणि दहशतवाद्यांच्या धमक्या
जमिनीच्या मुद्द्यावर निसार मीर यांना अनेकदा स्थानिक लोकांचा तीव्र विरोध झेलावा लागला. काही वेळा तर त्यांच्यावर थेट हल्लेही झाले. इतकंच नाही तर दहशतवाद्यांकडूनही त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यांमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य घाबरून गेले आणि अखेर त्यांनी कुटुंबाला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं. दहशतवाद्यांनी निसार मीर यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की- जर त्यांनी हा प्रकल्प सोडला नाही,तर त्यांना ठार मारलं जाईल.
स्वप्न साकार झालं
या सर्व अडथळ्यांना तोंड देत निसार मीर यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यांनी न डगमगता काम सुरूच ठेवलं आणि आज जेव्हा हा भव्य प्रकल्प पूर्णत्वास पोहोचला तेव्हा सर्वात जास्त समाधान आणि अभिमान याच अधिकाऱ्याला वाटतो आहे.
काश्मीरसाठी नवा अध्याय
या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेनंतर काश्मीरला भारताच्या मुख्य भागाशी जोडणारा एक शाश्वत दुवा निर्माण झाला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक पायरी मानली जात आहे. या पुलामार्फत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून काश्मीरशी थेट रेल्वे संपर्क साधता येणार आहे – हे केवळ तंत्रज्ञानाचं नव्हे, तर जिद्दीचंही उत्तम उदाहरण आहे.