एनआयएच्या प्राथमिक तपास अहवालानुसार, या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबा, ISI (पाकिस्तानची गुप्तचर संस्था) आणि पाकिस्तानी लष्कर यांचा थेट सहभाग असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत.
या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी गटांनी सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले असून, POK (पाक अधिकृत काश्मीर) मधील हँडलर्सशी संपर्कात असलेले दहशतवादी भारतात घुसले होते. या दहशतवाद्यांना ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) कडून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली. OGW नेटवर्कच्या संपर्क यादीची नोंद पूर्ण झाली असून, लवकरच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
हल्ल्याच्या तपासात NIA ने 150 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. घटनास्थळी थ्री डी (3 D) मॅपिंग आणि रीक्रिएशनचा वापर करत तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे. या तांत्रिक अहवालाचे संकलनही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल DG NIA (महानिरीक्षक, राष्ट्रीय तपास संस्था) यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे आणि लवकरच तो गृहमंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालानंतर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पुढील टप्प्याचे ऑपरेशनसाठी सज्ज झाल्या आहेत.
एनआयए संचालकांची आज पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक
राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक सदानंद दाते हे आज देशभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. या बैठकीत देशातील अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर, दहशतवादविरोधी कारवाया आणि विविध राज्यांतील समन्वय या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.