मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. एका बोलेरो कारने काही भाविक प्रयागराजच्या दिशेनं जात होते. दरम्यान, प्रयागराज मिर्झापूर रस्त्यावर त्यांची बोलेरो कार समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बसला धडकली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने या अपघातात बोलेरो कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले. सर्व मृत भाविक बोलेरोतून प्रवास करत होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस मध्यप्रदेशची होती आणि बोलेरो गाडी छत्तीसगडची असल्याचं सांगितलं जात आहे. बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व लोक छत्तीसगडचे रहिवासी होते. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक संगममध्ये स्नान करण्यासाठी येत होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.
प्रयागराजमधील या अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.