हनिमूनसाठी शिलाँग गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला होता. तर, सोनमचा थांगपत्ता लागला नव्हता. 23 मे पासून राजा बेपत्ता होता. तर, 2 जून रोजी त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात राजाची हत्या झाल्याचे समोर आले होते. मात्र, सोनम बेपत्ता असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले. पोलिसांकडून सोनमचा शोध सुरू होता. अखेर तिने घरच्या लोकांना फोन करून गाझियाबादमधील आपलं लोकेशन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत तिला अटक केली. सोनम रघुवंशीवर तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट आणि हत्येचा आरोप आहे. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत राजाच्या हत्येचा कट रचला असल्याचे समोर आले. राजाला संपवण्यासाठी त्याची सुपारी दिली गेल्याचा आरोप आहे.
advertisement
राजाचा काटा काढल्यावर कुठं गेली होती सोनम?
शिलाँग पोलिसांनी या प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. शिलाँगचे पोलिस अधीक्षक विवेक स्येम यांनी सांगितले की, हत्येनंतर सर्व आरोपी गुन्हा घडलेल्या घटनास्थळापासून 11 किमी दूर एकत्र जमले. त्यानंतर त्यांनी सर्वांनी वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे नियोजन केले.
राजाला संपवल्यानंतर सोनम ही रेल्वेने शिलाँगहून सिलिगुडीमार्गे इंदूरला पोहोचली. 25 मे रोजी ती प्रियकर राज कुशवाहला भेटली. येथे ती एक दिवस राजसोबत भाड्याच्या खोलीत राहिली. यानंतर ती कारने उत्तर प्रदेशात पोहोचली. इंदूर ते उत्तर प्रदेशच्या प्रवासा दरम्यान ती राजच्या सतत संपर्कात होती, अशी माहिती शिलाँगच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. मात्र, इंदूर पोलिसांनी याबाबत काहीही माहिती दिली नाही.