भुजमधील भाषणात पाकिस्तानवर टीका करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, लोकांना नाश्ता करण्यासाठी जितका वेळ लागतो, तितक्यात तुम्ही शत्रूंना संपवले आहे. ते म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुम्ही जे काही केले त्यामुळे सर्व भारतीयांना अभिमान वाटला आहे, मग ते भारतात असोत किंवा परदेशात. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त 23 मिनिटे पुरेशी होती. लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्यात तुम्ही तुमच्या शत्रूंना संपवलं, असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
advertisement
भूज हवाई तळावर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'कालच मी श्रीनगरमध्ये आपल्या शूर लष्करी जवानांना भेटलो. आज मी येथे हवाई योद्ध्यांना भेटत आहे. काल मी उत्तर भागात आपल्या सैनिकांना भेटलो आणि आज मी देशाच्या पश्चिम भागात हवाई योद्धे आणि इतर सुरक्षा दलाच्या जवानांना भेटत आहे. दोन्ही आघाड्यांवर प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहून मी उत्साहित आहे. मला खात्री आहे की तुम्ही भारताच्या सीमा सुरक्षित ठेवाल. यादरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी बशीर बद्र यांच्या एका ओळीतून पाकिस्तानला सल्लाही दिला. 'कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल के चलना क्योंकि तुम नशे में हो.', या शायरीतून सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
भारतीय हवाई दलाने आकाशात नवीन उंची गाठली आहे: राजनाथ सिंह
राजनाथ सिंह म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय हवाई दलाने बजावलेल्या प्रभावी भूमिकेचे केवळ या देशातच नव्हे तर इतर देशांमध्येही कौतुक होत आहे. या ऑपरेशनमध्ये तुम्ही केवळ शत्रूवर वर्चस्व गाजवले नाही तर त्यांना संपवण्यातही यशस्वी झाला आहात. दहशतवादाविरुद्धच्या या मोहिमेचे नेतृत्व आमच्या हवाई दलाने केले. आपले हवाई दल हे एक असे 'स्काय फोर्स' आहे, ज्याने आपल्या शौर्य, धैर्य आणि वैभवाने आकाशाच्या नवीन आणि उंच शिखरांना स्पर्श केला आहे. आपल्या हवाई दलाची पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहोच आहे ही काही छोटी गोष्ट नाही, हे पूर्णपणे सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी म्हटले.
रात्रीच्या अंधारात ब्रह्मोसने शत्रूला दिवसाचा प्रकाश दाखवला आहे.
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की आज परिस्थिती अशी आहे की भारताची लढाऊ विमाने सीमा ओलांडल्याशिवाय येथून देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात मारा करण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानी भूमीवरील नऊ दहशतवादी तळ तुम्ही कसे उद्ध्वस्त केले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे; त्यानंतरच्या कारवाईत, त्यांचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त झाले. राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने स्वतः 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद स्वीकारली आहे. आपल्या देशात एक खूप जुनी म्हण आहे आणि ती म्हणजे - 'दिवसा तारे दाखवणे'. पण भारतात बनवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने रात्रीच्या अंधारात शत्रूला दिवसाचा प्रकाश दाखवला. ते म्हणाले की, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि डीआरडीओने बनवलेल्या 'आकाश' आणि इतर रडार प्रणालींनी त्यात मोठी भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.