नेमकं प्रकरण काय?
श्रद्धा उर्फ आयुषी तिवारी ही गुजरातमधील एका कॉलेजमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आहे. २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. ती घरातून बाहेर पडताना तिने आपला मोबाईल घरीच ठेवला होता. त्यामुळे श्रद्धा कुठे गेली? तिच्यासोबत काय घडलं? याचा कुणाला काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ती लाल टी-शर्ट आणि जीन्समध्ये लोटस चौकातून विजय नगरच्या दिशेने जाताना दिसली. दुसऱ्या एका फुटेजमध्ये ती एका दुकानाजवळ एका व्यक्तीकडून बॅग घेताना आणि एका महिलेसोबत जातानाही दिसली.
advertisement
बेपत्ता झाल्यनंतर श्रद्धाच्या वडिलांनी घराच्या दारावर श्रद्धाचा फोटो उलटा टांगला आणि तिचा शोध घेणाऱ्यासाठी ५१,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर सात दिवसानंतर श्रद्धा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली आणि आपण बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी घरातून निघून गेल्याची माहिती दिली.
श्रद्धाने पोलिसांना सांगितले की, ती तिचा बॉयफ्रेंड सार्थकसोबत ट्रेनने जाणार होती, पण तो न आल्यामुळे ती रेल्वे स्टेशनवर करणदीपला भेटली. करणदीप हा कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. दोघांनी महेश्वर येथे जाऊन लग्न केले. तिच्या वडिलांनीही पोलिसांना सांगितले की, श्रद्धाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. तिच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी तिला जावरापर्यंत येण्यास सांगितले आणि तिला पैसे पाठवले. तेव्हाही करण आणि श्रद्धा एकत्र होते.
पोलिसांना संशय
पोलिसांनी श्रद्धाच्या या गोष्टीवर विश्वास ठेवलेला नाही. तिने लग्नाचे कोणतेही अधिकृत कागदपत्रं पोलिसांना दिलेले नाहीत. गुन्हे शाखेचे अधिकारीही चौकशी करत आहेत. श्रद्धाने दिलेल्या माहितीत काहीतरी काळंबेरं असावं, असा संशय पोलिसांना आहे..
श्रद्धाच्या वडिलांनीही तिच्या मानसिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "मी या लग्नाला मानत नाही, पण ती आता सज्ञान आहे, त्यामुळे ती जो निर्णय घेईल तो आम्ही स्वीकारू. माझी मुलगी मानसिकदृष्ट्या ठीक नाही. करणने मला सांगितले की ती त्याला रेल्वे स्टेशनवर भेटली आणि ती आत्महत्या करणार होती, तेव्हा त्याने तिला वाचवले."
दुसरीकडे, पोलिसांनी जेव्हा श्रद्धाचा बॉयफ्रेंड सार्थकडे याबाबत चौकशी केली, तेव्हा दोघंही मागील काही महिन्यांपासून बोलत नसल्याचं सार्थकने सांगितलं. शिवाय आपल्याला श्रद्धाने खूप दिवसांपूर्वी ब्लॉक केलंय, अशीही माहिती त्याने दिली. यामुळे श्रद्धासोबत नेमकं काय घडलं? ती सात दिवस कुठे होती? याचा तपास पोलीस करत आहेत.
