सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश बेला त्रिवेदी या ९ जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे १६ मे रोजी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरेनुसार, त्यांचा निरोप समारंभ होणे अपेक्षित होते. निवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे बार असोसिएशन आयोजित करीत असते. मात्र 'एससीबीए' आणि 'एससीएओआरए' या दोन्ही संघटनांनी निरोपाचा कार्यक्रम आयोजित केला नाही. न्यायाधीशाला निरोप दिला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले.
advertisement
सरन्यायाधीश भूषण गवई काय म्हणाले?
परंपरेला धरून न्यायमुर्ती बेला त्रिवेदी यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम व्हायलाच हवा होता पण बार संघटनांनी तो केला नाही. या गोष्टीचा अगदी उघडपणे विरोध करायलाच हवा. बार असोसिएशने अशी भूमिका घ्यायला नको होती, अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई नाराजी व्यक्त करून बार असोसिएशनला परखड शब्दात सुनावले.
बार असोसिएशनने विरोधी भूमिका घेतलेली असली तरी कपील सिब्बल श्रीवास्तव या दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष करून उपस्थिती दर्शवली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मंडळाने मंजूर केलेल्या ठरावाला न जुमानता ते आले. बेला त्रिवेदी या चांगल्या न्यायाधीश होत्या, यावर त्यांच्या उपस्थितीने शिक्कामोर्तब होते.
बार असोसिएशनमधील एका गटाचा बेला त्रिवेदी यांच्यावर राग का?
सर्वोच्च न्यायालयात बनावट वकिलपत्राचा वापर करून बनावट याचिका दाखल केल्याच्या कथित प्रकरणात काही वकिलांच्या विरोधात न्यायमु्र्ती बेला त्रिवेदी यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. बार अधिकाऱ्यांनी न्या. त्रिवेदी यांना विनंती करीत होते. परंतु मागेपुढे न पाहता आपल्या भूमिकेवर बेला त्रिवेदी ठाम राहिल्या. तसेच कथित गैरवर्तन केल्याबद्दल काही वकिलांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्या. त्रिवेदी यांनी दिले होते. त्यानंतरचा माफीनामा स्वीकारण्यास देखील त्रिवेदी यांनी नकार दिला होता. न्या. त्रिवेदी यांचा कडक आणि ताठर स्वभाव लक्षात घेताच बार असोसिएशनमधील एका गटाने निरोप समारंभ आयोजित न करण्याची भूमिका घेतल्याचे कळते.