अपघातानंतर सावरला होता, पण काळाने गाठले...
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निवेश आपल्या मित्रांसोबत अमेरिकेत Skiing करण्यासाठी गेला होता. तिथे झालेल्या एका अपघातात तो जखमी झाला. न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते आणि तो हळूहळू सावरत होता. कुटुंबियांना तो लवकरच घरी येईल अशी आशा होती, मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.
advertisement
बॉक्सिंग चॅम्पियन ते यशस्वी उद्योजक
अग्निवेशचा जन्म ३ जून १९७६ रोजी पाटण्यातील एका मध्यमवर्गीय बिहारी कुटुंबात झाला होता. अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेला अग्निवेश हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी होता. तो बॉक्सिंग चॅम्पियन होता, त्याला घोडेस्वारीची आवड होती आणि तो एक उत्तम संगीतकारही होता. त्याने 'फुजैराह गोल्ड' सारखी मोठी कंपनी उभी केली आणि 'हिंदुस्थान झिंक'चा चेअरमन म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
फक्त मुलगा नव्हता, तर मित्र होता!
आपल्या मुलाच्या आठवणीत अनिल अग्रवाल लिहितात, "अग्नि अत्यंत साध्या स्वभावाचा होता. तो जितका कर्तृत्ववान होता, तितकाच जमिनीशी जोडलेला माणूस होता. तो माझा केवळ मुलगा नव्हता, तर माझा मित्र आणि माझी शान होता. त्याने आणि मी मिळून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते." मुलाच्या निधनाने अनिल आणि किरण अग्रवाल हे दाम्पत्य पूर्णपणे खचले आहे. मात्र, मुलाला दिलेल्या शब्दाची आठवण करून देत अग्रवाल यांनी एक मोठा संकल्प जाहीर केला.
"मी अग्निवेशला वचन दिले होते की, आमच्याकडे जे काही धन येईल, त्यातील ७५ टक्क्यांहून अधिक हिस्सा आम्ही समाजासाठी खर्च करू. आज मी ते वचन पुन्हा सांगतो. आता उर्वरित आयुष्य मी अधिक साधेपणाने जगून समाजसेवेसाठीच वाहून घेईन," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अग्निवेशच्या मागे आई-वडील, पत्नी, बहीण प्रिया आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. एका जिद्दी आणि जिंदादिल तरुणाच्या अशा अकाली जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे.
